पारोळा (जळगाव) : पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथील बेपत्ता तरूण मृतावस्थेत आढळला आहे. २२ वर्षीय तरुण काही दिवसापूर्वी घरातून बेपत्ता होता. त्याचा कन्हेरे शिवारातील एका विहिरीत मृतदेह आढळला आहे. त्याचा पडून मृत्यू झाल्या असल्याचा वर्तवण्यात येत आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पारोळा तालुक्यातील कन्हेरे येथील अमोल पाटील (वय २२) हा १३ जानेवारीला घरी कोणालाच काही न सांगता निघून गेला होता. याआधी देखील तो दोन ते तीन वेळेस असाच घरातून बेपत्ता झाला होता. परंतु तो प्रत्येक वेळी घरी येऊन येत होता.
मात्र यावेळेस तो घरी परतलाच नाही. दरम्यान २२ जानेवारीला सव्वा तीन वाजेच्या सुमारास गावातील नामदेव महारु पाटील यांच्या शेतात असलेल्या विहिरीमध्ये त्याचा मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत मिळून आला. यावेळी गावकऱ्यांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला. पारोळा पोलिसांत त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.