नाशिक : मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड लागल्याने दुखापत झाल्याची घटना घडली आहे. देशसेवा बजावत असताना वीरमरण आलेल्या वरणगाव येथील अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेताना ही घटना घडली.
जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन वरणगाव शहरात गेले होते. वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी सैन्याच्या ट्रकमध्ये चढले असताना ट्रकचा वरचा लोखंडी रॉड त्यांच्या डोक्याला लागला. त्यानंतर, डोक्यातून रक्तस्राव होत असताना गिरीश महाजन यांनी वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या पार्थिव देहाला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन केले.
मात्र, डोक्याचे रक्त थांबत नसल्यामुळे तेथे उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील काळे, कामगार नेते मिलिंद मेढे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, शेख आखलाक यांनी आग्रह दुखापतीनंतर जखमी अवस्थेतच मंत्री महाजन यांना वरणगाव येथील निमजाय हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर ते वीर जवान अर्जुन बाविस्कर यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. त्यानंतर, त्यांची महत्त्वाची बैठक असल्याने ते पुढे नाशिककडे रवाना झाले आहेत.