नाशिक : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात शांतता रॅली काढली असून मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे राजकारण सध्या चांगलेच तापताण दिसत आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. तर मनोज जरांगेंच्या मागणीला ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध केला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात खूप वेळा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संघर्ष झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे मनोज जरांगेंची शांतता रॅली नाशिकमध्ये येत असताना पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. मनोज जरांगे नेमकं काय भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ..
ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली असून दोन अधिकारी आणि 20 हून अधिक अंमलदार भुजबळ फार्म येथे तैनात करण्यात आले आहे. जरांगे यांच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर भुजबळ फार्मची सुरक्षा वाढवण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. भुजबळांच्या घराभोवती बॅरिकेटिंग लावण्यात आले आहे. तसेच घराभोवती जाणाऱ्या रस्त्यांवर सुद्धा बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.
असा असेल शांतता रॅलीचा मार्ग..
मंगळवारी 13 तारखेला सकाळी तपोवन, नाशिक या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होणार असून जिल्ह्याच्या मराठा समाजाच्या वतीने त्यांचे स्वागत करून शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे. तपोवन जुना आडगाव नाका-निमाणी मालेगाव स्टॅण्डमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर रविवार कारंजा, मेहेर सिग्नल यामार्गे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ शिवस्मारकास मनोज जरांगे पाटील अभिवादन करतील.