नाशिक : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, या मागणीसाठी जरांगे यांनी तिसऱ्या टप्प्यातील दौऱ्यांना सुरुवात केली आहे. सभांच्या माध्यमातून जरांगे संपूर्ण महाराष्ट्रभर एल्गार पुकारत आहेत. नाशिकमधील सभेत त्यांनी महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सहभागाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांच्यावर कडाडून टीका केली. म्हाताऱ्या माणसाने आता जास्त बोलू नये, पाणी कमी पडू शकते. आता नाही, आरक्षण मिळू द्या, मग बघतो.
यांनी कोणाचे बंगले बळकावले, मुंबईत काय केले, कोणत्या चित्रपटात काम केले, हे सगळे मला माहीत आहे. एवढेच सांगतो, आमच्या आड येऊ नका… आरक्षण मी छाताड्यावर बसून घेतो, असा थेट इशारा देत, जरांगे यांनी भुजबळांना नाशिकमध्येच घेरले. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील सहभागाबद्दल त्यांनी भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली.
भुजबळांचे नाव न घेता जरांगे यांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. २०१६ मध्ये ज्या घोटाळ्यात भुजबळांना महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपी घोषित केले होते. त्या घोटाळ्याचा संदर्भ देत जरांगे-पाटील म्हणाले की, लोकांच्या पैशाची लूट झाली, म्हणून तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागला.
२०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये भुजबळ सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना दिल्लीतील महाराष्ट्र सदन इमारतीचे कंत्राट देण्याच्या प्रक्रियेत अनियमितता झाली होती. आम्हाला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. म्हाताऱ्या माणसाने आता बोलू नये. तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रीबाईंचे नाव का नाही, असा सवाल देखील जरांगे यांनी उपस्थित केला.
जरांगे यांनी या वेळी सरकारला विनंती केली. ते म्हणाले की, हे जातीय तेढ पसरवत आहेत, यांना वेळीच रोखा. शांतता राखणे हे सरकारचे काम आहे. पण सरकार आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे. आम्ही शांततेचे आवाहन करत आहोत. आम्हाला आरक्षण दिले नाही तर कोड्यवधी मराठे आंदोलनाला सज्ज आहेत. नाशिकच्या पवित्र भूमीतून आवाहन करतोय, सर्व पक्षातील मराठा नेत्यांनी मराठा लेकरांच्या पाठीशी उभे रहा, नाहीतर तुम्हाला लक्षात ठेवतील असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, भुजबळ मराठा आरक्षणात अडथळे निर्माण करत आहेत. त्यामुळे मी त्याला विरोध करणार आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. भुजबळ यांनी मराठा समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने समाजबांधवांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.