हरसूल: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथे कुऱ्हाडीचे घाव घालून पत्नीची हत्या करणाऱ्या संशयित पतीनेही आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. कैलास ढवळू भुसारे (वय ३७, रा. ठाणापाडा, ता. त्रंबकेश्वर) असे आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे. त्याने शुक्रवारी (दि. २७) पत्नी उषा कैलास भुसारे (वय ३३) हिची चारित्र्याच्या संशयातून हत्या केल्यानंतर तो फरार झाला होता. त्यामुळे पोलीस त्याचा शोध घेत असताना रविवारी (दि. २९) सकाळी पोलिसांना त्याचा मृतदेह जांभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरसूल पोलीस ठाण्यात दाखल खुनाच्या गुन्ह्यातील संशयित कैलास ढवळू भुसारे याने त्याची पत्नी उषा भुसारे (वय ३३) हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन ती घरात झोपलेली असताना रागाच्या भरात कुऱ्हाडीने तिच्या चेहऱ्यावर व मानेवर वार करून तिला जिवे ठार मारले. यावेळी मुलगा मोहित कैलास भुसारे (वय १५) हा त्याच्या आईला सोडविण्यासाठी गेला असता संशयिताने त्याच्यावरही जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने वार करून त्यास गंभीर जखमी केले. या घटनेनंतर संशयित फरार झाला असल्याने पोलीस त्याचा शोध घेत होते.
हरसूल पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुका पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची तपास पथके शुक्रवार (दि.२७) पासून संशयित कैलास भुसारे याचा शोध घेत असताना अखेर रविवारी (दि.२९) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास संशयित ठाणापाडा येथील इरफान शेख व इम्तीयाज शेख यांच्या घरामागील बाजूस जांभळीच्या झाडाला इलेक्ट्रिक वायरच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबत त्याचा भाऊ नामदेव ढवळू भुसारे यांनी पोलिसांना खबर दिल्याने या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हरसूल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रताप जाधव करीत आहेत.