नंदुरबारः कानातील ७ ग्रॅम सोन्याच्या बाळीसाठी ब्लेडने ७८ वर्षीय वृध्दाचे कान कापून नेत डोक्यावर वार करुन निघृण हत्या केल्याची घटना तालुक्यातील बलवंड शिवारात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकऱ्यांचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात खूनाच्या घटनांची मालिकाच सुरु असून मारेकऱ्यांनी नंदुरबार पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.
साक्री तालुक्यातील पैचाळे येथील भटा मखन बोरसे यांचे नंदुरबार तालुक्यातील बलवंड शिवारात शेत आहे. याच शेतात त्यांनी पत्र्याचे घर बांधले आहे. भटा बोरसे बऱ्याचदा शेतातच राहतात. त्यांच्या कानात ७ ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी होती. २५ जूनच्या रात्री ते २६ जूनच्या सकाळी ८.३० वाजेदरम्यान मारेकऱ्याने त्यांच्या कानातील सोन्याच्या वाळीसाठी संधी साधत ब्लेडने त्यांचे कान कापले व काहीतरी वस्तूने त्यांच्या डोक्यावर वार करुन जीवेठार केले. दरम्यान, सदरची घटना बुधवारी (दि. २६) सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. ७८ वर्षीय भटा बोरसे यांचा खून झाल्याचे समजताच घटनास्थळी गर्दी झाली. याबाबत नंदुरबार तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. यानंतर घटनास्थळी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारात तालुका पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड पथकासह दाखल झाले. घटनेचा पंचनामा केल्यानंतर भटा बोरसे यांचा मृतदेह नंदुरबार जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घटनास्थळी ब्लेड आढळून आले आहे.
दरम्यान, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. मारेकऱ्याच्या शोधासाठी तालुका पोलिसांनी पथक रवाना केले आहे. याबाबत मृत भटा बोरसे यांचा मुलगा अशोक बोरसे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.