यावल : आपल्या लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी गुजरातहून आलेल्या सेवेकरी भावाने बहिणीचे लग्न होण्यापूर्वीच जगाचा निरोप घेतला. यामुळे हा लग्न सोहळा साध्या पद्धतीने लावण्यात आला. ही मन हेलावणारी ही दुखःद घटना यावल तालुक्यातील डोंगर कठोरा गावात घडली. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील लीलाधर सरोदे यांची कन्या नमिता सरोदे हिचा विवाह १७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी तसेच वराकडील मंडळींनी १६ नोव्हेंबर रोजी सवाद्य नाच, गाण्याचा आनंद लुटला. दरम्यान, १७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नववधू नमिता सरोदे हिचा लहान भाऊ तसेच स्वामीनारायण मंदिरात सेवकरी म्हणून कार्यरत असलेल्या राकेश सरोदे हा आपल्या लाडक्या बहिणीच्या लग्नासाठी गुजरातमधील वडताल येथून डोंगर कठोरा येथे आलेला होता.
त्यानंतर डोंगर कठोरा गावातील स्वामीनारायण मंदीरात राकेश सरोदे हा झोपलेला होता. झोपेत असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा झोपेतच मृत्यू झाला. दरम्यान, बहिणीच्या लग्नासाठी आलेल्या सेवेकरी भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने लग्नाचा आनंद सोहळ्यात दुखःचे वातावरण पसरले. अखेर मयत सेवेकरी लहान भाऊ राकेश सरोदे यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वडताल (गुजरात) येथे पाठवण्यात आला. याच दुखःद प्रसंगात अगदी साध्या पद्धीतीने नमिता लीलाधर सरोदे यांचा विवाह यावल तालुक्यातील दहिगाव येथील राहुल पाटील यांच्यासोबत लावण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.