जळगाव : लग्नसमारंभ म्हटलं की घरात आनंदाचे वातावरण असते. काय करावं, काय नको असं होत असतं. पण जळगावात या आनंदाच्या दिवसांतच एक दुर्दैवी घटना घडली. पुतणीच्या लग्नात नाचताना काकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथे घडली.
गुलाब बाबूलाल पवार (वय 28, रा. चाळीसगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुलाब हा चाळीसगावात परिवारासह राहत होता. मिस्त्री काम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होता. वसंतवाडी येथे त्याच्या पुतणीचे बुधवारी (दि.8) लग्न होते. त्यानुसार, घरात आनंदाचे वातावरण होते. याच निमित्ताने वसंतवाडी येथे गुलाब आला होता. मंगळवारी (दि.7) रात्री हळदीच्या कार्यक्रमात नाचगाण्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी गुलाबला काही नातेवाईकांनी खांद्यावर घेऊन नाचवले.
पण नंतर नाचत असतानाच गुलाब याला अचानक चक्कर आली. यामध्येच तो खाली कोसळला. त्याला नातेवाईकांनी तात्काळ रूग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, त्याला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. या ऐन लग्नकाळातच काकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.