नाशिक : शहरातील एकास सायबर भामट्यांनी चांगलाच दणका दिला. मुंबई पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी नरेश गोयल यांच्या मनी लॉण्डरिंग केसमध्ये सहभाग असल्याचा आरोप करीत ही फसवणूक केली. अवघ्या पाच ते सहा दिवसांत साडेतेरा लाख रुपये या प्रकरणात उकळले गेले असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एकाला संशयितांनी मोबाईल आणि व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संवाद साधत मुंबई पोलीस आणि आर्थिक फसवणुकीवर नियंत्रण मिळविणाऱ्या ट्राय या संस्थेतून बोलत असल्याचे भासवले. नरेश गोयल यांच्या मनी लॉण्डरिंग केसमध्ये सहभाग असल्याचा आरोप करीत भामट्यांनी तक्रारदारास धमकावले.
या प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी भयभीत झालेल्या तक्रारदारास तब्बल १३ लाख ५० हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आले. हा प्रकार दि. १४ ते १९ डिसेंबर दरम्यान घडला. मात्र, हा प्रकार बनाव असल्याचे निदर्शनास आल्याने तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, अधिक तपास निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.