नाशिक : कोणालाही न कळू देता शहरात आयकर विभागाने गोपनीय पद्धतीने मोठी कारवाई केली आहे. बडे व्यवसायिक आणि ठेकेदारांनी कर बुडवल्याच्या संशयावरून मुंबईतील आयकर विभगाचे पथक पहाटे नाशिकमध्ये दाखल झाले होते. या कारवाईसाठी साधारण 70 वाहनांमध्ये 150 अधिकाऱ्यांचे पथक नाशकात दाखल झाले होते.
हे पथक छत्रपती संभाजी नगर इथे दाखल झाले होते. जालना येथे कारवाई करायची असल्याचे सांगण्यात आले. मात्र आज पहाटे हे पथक नाशिकमध्ये दाखल झाल आहे. पहाटे अचानक शहरात साधारण 15 ते 20 ठिकाणी एकाचवेळी हे छापे टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दहा महिन्यात तिसरी कारवाई
दहा महिन्यातील नाशिक शहरात आयकर विभागाची ही तिसरी कारवाई आहे. एप्रिल 2023 मध्ये नाशिक शहरात आयकर विभागाने राज्यातील सर्वात मोठी कारवाई केली होती. ही कारवाई सलग सहा दिवस चालली होती. या कारवाईत राज्यातील 225 आयकर अधिकाऱ्यांचे पथक होते. या छापेमारीत नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांचे साडेतीन हजार कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार उघडकीस आले होते. तर तीन कोटीची रोकड आणि अडीच कोटींचे दागिने आयकर विभागाने जप्त केले होते.
14 ठिकाणी छापे
4 कंत्राटदार आणि 10 बिल्डर अशा 14 ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. या कंत्राटदाराने माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शासनाकडून मंजूर करून आणलेल्या कामांचे एकत्रीकरण करून ते काम आपल्याकडे घेतले. त्यानंतर उपकंत्राटदारांमार्फत ते इतरांना वाटप केले. या कामात मोठा व्यवहार झाल्याची माहिती आहे.