मुंबई : काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे. परंतु, त्यापूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे आणि तोही नंदुरबारमध्येच. नंदुरबार जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेते पद्माकर वळवी हे सध्या भाजपच्या वाटेवर आहेत. पद्माकर वळवी यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. माजी मंत्री पद्माकर वळवी हे 13 मार्चला बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
पद्माकर वळवी हे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आहेत. मंत्री असताना त्यांनी राज्याच्या क्रीडा खात्याचा कार्यभार सांभाळला आहे. नंदुरबार आणि उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्यांपैकी एक म्हणून पद्माकर वळवी यांची ओळख आहे. 2009 मध्ये ते कॉंग्रेसच्या तिकिटावर शहादा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले होते. परंतु, 2014 च्त्यांया निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. माजी मंत्री पद्माकर वळवी यांच्या पत्नीही राजकारणात सक्रीय असून त्या सध्या जिल्हा परिषद सदस्या आहेत.