नंदुरबार : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला नंदुरबारमध्ये मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्ता तथा माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी भाजपला राजीनामा दिला आहे. अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे पक्षाला अडचण होऊ नये यासाठी मी राजीनामा देत आहे असे त्यांनी म्हटले आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास डॉ. गावित इच्छुक होत्या. मात्र, हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे आता त्यांनी भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारच, त्यांच्याकडे असलेल्या सर्व पदांचा राजीनामाही पक्षाकडे दिला आहे. डॉ. गावित यांच्या राजीनाम्यामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
”शिंदे गटाच्या विरोधी भूमिकेमुळे अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. शिंदे गटाचे नेते काँग्रेसचा प्रचार करत आहेत. महायुतीबाबत शिंदे गटाची गद्दारी असल्याने भाजपला राजीनामा दिला आहे. अक्कलकुवा मतदारसंघाला विकासाच्या बाबातीत नंबर वन करणार आहे. महायुतीत निष्ठा आम्हीच पाळायची का? माझ्यामुळे पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांना अडचण होऊ नये म्हणून पक्षाचा आणि पदाचा राजीनामा देत आहे”, असं म्हणत हीना गावित यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.
हिना गावित यांनी भाजपला रामराम ठोकल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपला नंदुरबारमध्ये मोठा धक्का बसला आहे.