सिन्नर : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या रामनगर येथे चिमुकल्या बहीण-भावाचा पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने रामनगरसह तालुकाभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
आविष रवींद्र भंडकर (5) आणि धनश्री रवींद्र भंडकर (4) असे यामध्ये मृत्यू झालेल्या बहिण-भावाची नावे आहेत. गावातील एका कुटुंबातील बाहेरगावी लग्न असल्याने संपूर्ण गावच लग्नाला गेलेले होते. तर काही थोडेफार लोक गावात होती. धनश्री व आविषचे वडीलही लग्नाला गेले होते. तर मुलांची आई घरीच होती. ही मुले आपल्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाच ते सहा फूट खोल असलेल्या छोट्याशा पाण्याचा तलावात खेळत होती. दोघेही खेळता खेळता केव्हा पाण्यात पडली हे कोणाच्याही लक्षात आले नाही.
लग्नावरुन जेव्हा लोक गावात आले, तेव्हा तलावाजवळ लहान मुलांचा आरडाओरडा सुरु असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. काहींनी तेथे जाऊन पाहिले असता दोन चिमुकली मुले पाण्यावर तरंगत असलेली त्यांना आढळून आली. त्यानंतर तातडीने डॉक्टरांना बोलावण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, याप्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.