राहुरी, (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली क्षेत्रात कार्यरत असलेल्या आढाव दाम्पत्याचा २६ जानेवारीला निघृण खून केल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पती पत्नीचा मृतदेह उंबरे (ता. राहुरी) येथील स्मशानभुमीतील विहिरीत आढळून आला आहे. या घटनेने नगर जिल्हा हादरला आहे.
अॅड. राजाराम जयवंत आढाव (५२) आणि अॅड. मनिषा आढाव असं या खून झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. सायंकाळी त्यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. दोघांनाही दगड बांधून विहीरीत टाकून दिल्याचे निदर्शनास आले आहे. पैशाच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राहुरी न्यायालयात वकिली क्षेत्रात कार्यरत असलेले अॅड. राजाराम आढाव आणि अॅड. मनिषा आढाव हे दाम्पत्य २५ जानेवारीला दुपारपासून बेपत्ता होते. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या नंतर पोलिसांनी शोध सुरु केला असता न्यायालय परिसरात २६ जानेवारी रोजी अॅड. आढाव यांची चारचाकी वाहन बेवारस अवस्थेत आढळून आले.
या चारचाकी वाहनाची तपासणी केली असता या वाहनात हातमोजे आणि एक बूट आढळून आला. तसेच अॅड. आढाव यांचे एटीएम आयसीआय बँकेसमोर बेवारस आढळून आले. दरम्यान, वकील दाम्पत्याच्या वाहनाची तपासणी करत असताना शेजारील एका चारचाकी वाहनातील चालकाने पोलिसांना बगून पळ काढला. त्यांनंतर पोलिसांनी कसून तपास करण्यास सुरु केलं.
दगड बांधून टाकले विहिरीत
मोबाईल फोन आणि सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले, चौकशीतून दाम्पत्याचा खून करून विहिरीत टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तसेच यामध्ये आणखी ४ आरोपींचा समावेश असल्याच पोलिसांनी सांगितलं. उंबरे (ता. राहुरी) येथील स्मशानभुमीतील विहिरीत दुपारी ३ वाजल्यापासून दोघांचा शोध सुरू होता. रात्री उशिरा दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.