मोहोळ : मित्रांना चिकन वाढण्याच्या कारणावरून पतीने पत्नीच्या पोटात चाकू खुपसल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना बुधवारी १० एप्रिल रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोहोळ तालुक्यातील देगाव (वाळूज) येथे घडली. याबाबत मोहोळ पोलिस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चक्रधर जुगारस काळे असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ तालुक्यातील देगाव (वाळूज) येथे चक्रधर काळे यांनी त्यांच्या घरी कोंबडीचे मटन आणून मित्रांना जेवणासाठी बोलावले होते. दरम्यान, जेवण करण्यासाठी सर्वांना ताटे वाढली होती. यावेळी चक्रधर यांनी पत्नी यशोदा यांना मित्रांना आणखीन मटन का वाढत नाही, असं म्हणत काठी आणि लोखंडी नळीने मांडीवर तसेच पायांच्या पोटऱ्यावर बेदम मारहाण केली.
त्यानंतर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत पती चक्रधर यांनी पत्नी यशोदा यांच्या पोटात चाकू खुपसला. त्यामुळे यशोदा या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जखमी यशोदा काळे शुद्धीवर असून त्यांनी जबाब दिला असल्याचे मोहोळ पोलिसांनी सांगीतले.
त्यांच्या जबाबानंतर पती चक्रधर जुगारस काळे यांच्याविरोधात मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कर्णेवाड हे करीत आहेत.