शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिर्डीत राज्यस्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात बोलताना जयंत पाटील यांनी विविध मुद्द्यांवरुन सरकारच्या धोरणांवर फटकेबाजी केली. सध्या देशभरात दडपशाहीचं वातावरण आहे. संसदरत्नांवर कारवाई झाली आहे. संसदेच्या सुरक्षेप्रकरणी आवाज उठवल्याने देशातले 143 खासदरांना सत्ताधाऱ्यांनी घरी पाठवलं आहे.
चर्चा होऊ द्यायचीच नाही असं चालवलं जात आहे. देशात कधीच अशी निलंबनाची कारवाई झाली नव्हती पण आता निलंबन करायचं आणि सरकार चालवायचं ही नवी पद्धत सुरु झाली असल्याचंही टीकास्त्र जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर सोडलं आहे. सुरक्षेच्या प्रश्नावरुन चर्चेची मागणी केली हा त्यांचा गुन्हा काय? असा सवाल जयंत पाटलांनी उपस्थित केला.
जयंत पाटील म्हणाले, पुढील काळात अनेक गोष्टी होणार आहेत.आगामी निवडणुकीत विरोधकांच्या भपकेबाजीला घाबरु नका, सत्ता असते तेव्हा फुकवटा असतो, अशी टोलेबाजी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. त्यांचं सरकार असल्यामुळे सरकारचं व्यासपीठ हे पक्षाचं व्यासपीठ असं समजून ते देशात राज्यात वागताहेत पण त्यांच्या भपकेबाजीला घाबरु नका…कारण सत्ता असते तेव्हा असा फुकवटा असतो, अशी टीका जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.