Jayakwadi Water Issue : नाशिक : मराठवाडा विरुद्ध उत्तर महाराष्ट्रात पाणीप्रश्न शिगेला गेला असे दिसत आहे. त्यावर सुरक्षेचा उपाय म्हणून नाशिक शहर वगळता उर्वरित जिल्ह्यात १९ जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश अपर जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिले आहेत.
परभणी येथील ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दोन दिवसांपूर्वी गंगापूर धरणाजवळ आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांनी कोणतीही पूर्वकल्पना न देताच अचानकपणे हे आंदोलन केल्यामुळे शासनाची झोप उडाली. पोलिसांसह जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. ‘आप’च्या कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात अर्धा दिवस गेल्याने अधिकाऱ्यांनी अखेर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली.
शहर वगळता संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी
अधिकाऱ्यांच्या या भूमीकेमुळे आंदोलनकर्त्यांनी लागलीच काढता पाय घेतला. पण जिल्ह्यातील पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता विचारात घेता अपर जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी मंगळवारपासून ते १९ जानेवारीपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) नुसार नाशिक शहर वगळता संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.
बिअरचे कारखाने बंद करा, मगच पाणी सोडा
मराठवाड्यातील बिअरच्या कारखान्यांना पाणी बंद झाल्यानंतरच नाशिकचे पाणी जायकवाडीमध्ये सोडण्याचा विचार करावा, अशी मागणी युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज, शेंद्रा, चिकलठाणा, डीएमआयसी करमाड व बिडकीन या औद्योगिक वसाहतीत बिअर कारखाने बंद करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.