जळगाव : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असतानाच जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जळगावातील मेहरुण परिसरात आज पहाटे 4 वाजेच्या सुमारास अपक्ष उमेदवार अहमद हुसेन यांच्या घरावर गोळीबार झाला. या हल्ल्यामध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही.
अपक्ष उमेदवार शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन यांच्या घरावर एका अज्ञात व्यक्तीने तीन गोळ्या झाडल्या. यामुळे मोठा आवाज झाल्याने शेख अहमद हुसैन गुलाम हुसेन खडबडून जागे झाले. त्यांनी याबाबत तपास केला असता काचेच्या खिडकीचा चक्काचूर झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना तीन रिकामी काडतुसे आढळून आले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा पोलीस तपास सुरु आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.