जळगाव : अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन कार्यालयात अधिकारी चक्क दारू पित असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ऑन ड्यूटी अधिकारी नशेत असल्याने त्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभा राहिला आहे. प्रशासकीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्याने पदाचा दुरुपयोग करुन कार्यालयातच मद्यपान करण कितपत योग्य आहे? असा प्रश्न सध्या अमळनेरमध्ये उपस्थित केला जातोय.
विशेष म्हणजे आपातकालीन परिस्थितीत किंवा संकट काळात या कार्यालयाची अतिशय मौल्यवान अशी मदत होते. असे असताना संबंधित अधिकाऱ्याला आपल्या जबाबदारीची जाणीव नसणे हे खरच विशेष आहे.
व्हिडीओत नेमकं काय आहे?
परेश उदेवाल तरुण अग्निशमन दलाच्या कार्यालय परिसरात जातो. तेव्हा कार्यलयाला दिवसा आतून कडी लावली होती. तो तिथे कार्यालयात मद्याचा पेला भरणाऱ्या एका अधिकाऱ्याला रंगेहात पकडतो. तो सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद करतो. यावेळी अधिकारी जे करायच ते कर, अस त्या तरुणाला उत्तर देतो. संबंधित व्हिडीओ अवघ्या काही सेकंदांचा आहे. पण या व्हिडीओत तरुणाला जे दाखवायचं आहे ते स्पष्टपणे दिसत आहे. अधिकारी काय करत आहे ते दिसून येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणी काही कारवाई होते का? किंवा इतर काय हालचाली घडतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अमळनेरमध्ये अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचं कार्यालयातच मद्यप्राशन, व्हिडीओ व्हायरल #viralvideo #jalgaon #amalner pic.twitter.com/sdewrpoS8S
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 18, 2024
नेमकं काय प्रकरण?
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर नगरपरिषदेच्या अग्निशमन कार्यालयातला अधिकारी दारू पित असल्याची माहिती काही दिवसापूर्वी पसरली होती. अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यासाठी परेश उदेवाल नामक तरुणाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीत केला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा प्रकार समोर आणल्यानंतर त्याने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती. पण त्या मुजोर अधिकाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. म्हणून तक्रारदार परेश उदेवाल याने उपोषणाचा इशारा देखील दिला आहे.