Jalgaon Accident : जळगाव : उत्तर महाराष्ट्रात सुट्टीचा दिवस अपघातांचा दिवस ठरला आहे. रविवारी दोन मोठे अपघात झाले आहेत. दोन्ही अपघात धार्मिक कार्यक्रमावरुन परत येत असताना झाले आहेत. नाशिक जिल्ह्यातील मनमाडजवळ अनकवाडे रेल्वे उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला होता. हा अपघात रविवारी संध्याकाळी झाला होता. त्यानंतर रविवारी रात्री दोन वाजता चाळीसगावमधील कन्नड घाटात भीषण अपघात झाला. त्यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
दोन्ही अपघात मोठी जीवितहानी झाली आहे. कन्नड घाटातून जात असतांना एमएच ४१ व्ही ४८१६ या क्रमांकाच्या तवेरा गाडीचा अन्य वाहनासोबत जोरदार अपघात झाला. या भीषण अपघातात प्रकाश गुलाबराव शिर्के (वय -६५), शिलाबाई प्रकाश शिर्के (वय -६० ), वैशाली धर्मेंद्र सुर्यवंशी (वय -३५), आणि पूर्वा गणेश देशमुख (वय -०८), हे चार प्रवासी जागीच मयत झाले. तर, रूपाली गणेश देशमुख वय (३०), अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०), कृष्णा वासुदेव शिर्के, (वय -४); जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी( वय १७ ), सिध्देश पुरुषोत्तम पवार( वय १२ ) , पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय -३५) आणि अभय पोपटराव जैन (वय ५०) हे सात जण जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कसा झाला अपघात
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावच्या कन्नड घाटात रविवारी रात्री पाऊस झाला. धुक्यात अंदाज न आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि तवेरा गाडी दरीत कोसळली. रात्रीच्या अंधारात हा भीषण अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. परिसरातून नागरिक देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने जखमींना चाळीसगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे दोन्ही बाजूने वाहने उभे राहिल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले.