नाशिक : नाशिक शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडापावचं दुकान चालवण्यावरून झालेल्या वादातून बहिणीने भावावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये भावाचे तीन दातही पाडले आहेत. नाशिकमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी बहिणीसह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अधिक की, वडापावचं दुकान चालवण्यावरून कैलास चाटे आणि त्यांची बहीण शिवकन्या चाटे यांच्यात वाद झाले. यानंतर शिवकन्या यांनी त्यांचा भाऊ कैलास याला शिवीगाळ करून जोरदार मारहाण केली. शिवकन्या यांनी आणखी दोघांना सोबत घेऊन कैलास यांना लाकडी दांडगा, प्लॅस्टिकची रॅकेट आणि वडापाव तळण्याच्या बेदम झाऱ्याने मारहाण केली. या मारहाणीत कैलास यांचे तीन दात तुटले तर खांद्यालाही गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या जुना ओढा रोड भागात अरिंगळे मळा येथे राहणाऱ्या कैलास भगवान चाटे यांचं मद्रास कॅफेच्या बाजूला श्री भगवती वडापाव सेंटर आहे. या वडापावच्या दुकानावरून त्यांचे आणि बहिणीचे वाद होऊन शिवकन्या चाटे (राहणार तुळशीबाग अपार्टमेंट, गणेश व्हॅलीसमोर, सिन्नर फाटा), चेतन डोंगरे (राहणार जत्रा हॉटेल, आडगाव) आणि रामसिंग अशा तिघांनी मारहाण केल्याची तक्रार कैलास चाटे यांनी केली.