नाशिक : विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा महायुतीला चांगलाच फायदा झाला आहे. काही एक कारणाने लाडकी बहीण योजना राेज चर्चेत असते. अशातच लाडकी बहीण योजनेबाबत माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं भाष्यं केलं आहे. ‘ज्या महिलांचे अर्ज नियमित नाही. त्यांनी स्वत:हून आपली नावे काढून घ्यावीत, अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास दंडासह रक्कम वसुली करावी’, असं मोठं वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. ते नाशिकच्या येवलामध्ये बोलत होते.
यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या अनियमिततेवरही छगन भुजबळ यांनी भाष्य केलंया आहे. माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ‘काही प्रमाणात हे खरं आहे. योजनेचे नियम काही वेगळे होते. त्यात एका घरात दोन महिलांना देता येत नाही. मोटार गाडी असेल तर त्यांना देता येणार नाही. गरीबांना त्याचा लाभ झाला पाहिजे, हा योजनेचा उद्देश आहे. जे नियमात बसत नाही, त्यांनी स्वतःहून आपले नावे काढले पाहिजे.’ असे भुजबळ म्हणाले.
छगन भुजबळ पुढे म्हणाले की, ‘ज्या लाडक्या बहिणींना पैसे दिले गेले, आता ते परत मागण्यात काहीच अर्थ नाही. ते आता मागू नयेत. पण याच्यापुढे लोकांना सांगावं. जे नियमात नाहीत, त्यांनी स्वतःहून यादीतील नावे काढून घ्यावे. अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास त्यांच्याकडून दंडासह वसुली करता येईल. जे झाले ते, लाडक्या बहिणींना अर्पण केलं, असे छगन भुजबळ म्हटले. दरम्यान, आता छगन भुजबळ यांनी केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावर महायुती आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते नेमकी काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे.