अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कर्जत- जामखेड विधानसभाप्रमुख मधुकर राळेभात यांनी पक्षाला राम राम ठोकला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रावादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राजीनामा देताना राळेभात यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
रोहित पवारांची कार्यकर्त्यांना कामगारांसारखी वागणूक
आमदार रोहित पवार यांनी गेल्या साडेचार वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष न ठेवता सर्व कार्यकर्त्यांना कामगारांसारखी वागणूक दिली. कोणत्याही कार्यकर्त्याचा सन्मान ठेवला नाही. सतत अपमानकारक वागणूक मिळाली, असे आरोप करत मधुकर राळेभात यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला रविवारी रामराम ठोकला. येत्या १५ सप्टेंबरपर्यंत मतदारसंघात फिरून कार्यकर्त्यांचे मत जाणून राजकीय भूमिका ठरविणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
शरद पवारांचा आदर ठेवून कॅबिनेट मंत्र्यांला पराभूत केले
पुढे बोलताना राळेभात म्हणाले की, मागील निवडणुकीत शरद पवार यांचा आदर ठेवून आम्ही एका स्थानिक कॅबिनेट मंत्र्यांला हजारो मतांनी पराभूत केले आणि रोहित पवार यांना निवडून आणले. मतदारसंघात जे कार्यक्रम होतात त्यांच्या फ्लेक्सवर प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष या पदाधिकाऱ्यांचे नाव किंवा फोटो न लावता स्वतःचे नाव, आईचे नाव व फोटो महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना नाव न वापरता आमदार रोहित पवार आयोजित कार्यक्रम केले जातात, असे मधुकर राळेभात म्हणाले.
शासकीय इमारती बांधून मोठा विकास केल्याचा बोलबाला
जामखेड तालुक्यातील मूलभूत गरजांचा विकास न करता शासकीय इमारती बांधून मोठा विकास केल्याचा बोलबाला केला जातो. मतदारसंघात विकास झाला नाही. आजही तालुक्यात वीज, पाणी, रस्ते हे ज्वलंत प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष करून अधिकाऱ्यांना बसण्या- उठण्यासाठी करोडो रुपये खर्च केला जात आहे.
२५-३० वर्षापासून ज्या कार्यकर्त्याने अहोरात्र पक्षासाठी काम केले, त्यांचाही सन्मान राखला जात नाही. बरेचसे कार्यकर्ते त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असून त्यांनाही सतत अपमानित केले जाते. दम देऊन भयभीत केले जाते किंवा विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. या सर्व गोष्टींना कंटाळून आम्ही आमच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून बाहेर पडत असल्याचे राळेभात यांनी यावेळी सांगितले.