जळगाव : जळगावमधून एक अपघाताची घटना समोर येत आहे. मेहरुण येथील मंगलपुरी गल्लीत घरासमोर काही महिला उभ्या राहून गप्पा मारत होत्या. त्यावेळी एका भरधाव कारने ५ महिलांसह २ चिमुरड्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.
शोभा रमेश पाटील (वय-६० रा. साईप्रसाद कॉलनी, मंगलपूरी, मेहरुन) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या पाठीमागे दिव्यांग पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. तर चार महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. संगीता प्रकाश महाजन (वय- ४८), जयश्री जगदीश राऊत (वय -३०), सुमनबाई साहेबराव पाटील (वय -६५), अर्चना पाटील (वय -४०) अशी जखमी महिलांची नावे आहेत.
ही घटना १८ जुलै रोजी सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान, या घटनेची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. गावातील जमावाने कार चालकाला बेदम मारहाण केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मेहरुण परिसरात अत्यंत अरुंद रस्ता आहे. मंगलपुरी गल्लीत ५ महिला आपल्या घरासमोर गप्पामारत उभ्या होत्या. आणि काही लहान मुले त्या ठिकाणी खेळत होती. एक महिला रस्त्यावरुन चालली होती. त्यावेळी सायंकाळी ६.३० च्या सुमारास रामेश्वर कॉलनीकडून एक भरधाव कार गल्लीत आली.
या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने या महिलांना उडविले. ही धडक इतकी भरधाव वेगात होती की, त्या धडकेत दुध घेण्यासाठी आलेल्या शोभा पाटील यांना गंभीर दुखापत होवून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर चार महिला आणि दोन लहान मुलं जखमी झाले आहेत.
एका महिलेच्या हातात असलेल्या चिमुकल्या बाळाला देखील मार लागला आहे. जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या अपघातातील कारचा चालक पवन कैलास पाटील (वय-25 रा. सप्तशृंगी कॉलनी, मेहरूण, जळगाव) येथील रहिवाशी आहे. हा चालक गाडी शिकत असल्याचे समोर आले आहे. अपघात झाल्यानंतर त्याला पकडून नागरिकांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. या अपघातामुळे पाटील परिवारावर शोककळा पसरली आहे.