श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील मौजे पिंप्री कोलंदर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि शाळेच्या आवारातच असलेल्या श्री कोलेश्वर मंदिराजवळ गांजा आणि हातभट्टी (गावठी दारू) राजरोसपणे विकत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही पोलीस प्रशासनानी कसलीही दखल घेतली नसून अवैध व्यवसाय सुरूच आहे.
यामुळे मध्यपी आणि चिलीम बहाद्दर यांच्या त्रासाला शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षिका कंटाळले आहे. शाळेचे मुख्याध्यापक कुताळ नाना आप्पा यांनी ग्रामपंचायतचे सरपंच सोनाली गणेश बोबडे व ग्रामसेविका सरला महाडीक यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मौजे पिंप्री कोलंदर येथे जिल्हा परिषद इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. या शाळेमध्ये एक शिक्षक व दोन शिक्षिका ज्ञानदानाचे पवित्र काम करतात. सदर शाळा ही रस्त्यालगत असून गावामध्ये आहे. शाळेच्या आवारातच श्री कोळेश्वर भव्य दिव्य मंदिर आहे. शालेय विद्यार्थ्याबरोबरच गावातील पुरुष महिला व वृध्द देवदर्शनासाठी येथे येतात. तर समोरच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. येथेही अनेक नागरिक प्राथमिक उपचारासाठी येत असतात.
तर शेजारीच गांजा, हातभट्टी (गावठी दारू), देशी दारूची राजरोसपणे विक्री सुरु आहे. या मध्यपीची बडबड, अर्वाच्छ भाषेतील शिवीगाळ तर कधी भांडण यामुळे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या मनावर याचा विपरीत परिणाम होत आहे. तर शाळेतील शिक्षक व शिक्षिका यांच्यासह देवदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे गावच्या ग्रामसेविका सरला महाडीक व गावच्या सरपंच सोनाली बोबडे यांच्याकडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कुताळ नाना आप्पा यांनी लेखी तक्रार केली असून याकडे बेलवंडी पोलिस याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.