नाशिक : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. सत्ताधारी महायुतीने सुद्धा जोरदार तयारीला सुरवात केली आहे. अशातच भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 170 जागांची रणनीती आखली आहे. 170 जागांसाठी किती मतदान लागणार, याचा आकडा सुद्धा त्यांनी सांगितला आहे.
सद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्यांची आज नाशिकमध्ये भाजपची बैठक पार पडली आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील आणि रक्षा खडसे उपस्थित होते. यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीबद्दल भाष्य केलं.
‘महाराष्ट्रात १७० जागा आणायच्या असतील तर आपल्याला २ कोटी ७५ लाख मतदान लागेल. उत्तर महाराष्ट्रात सर्वात जास्त जागा २०१४ मध्ये आणल्या होत्या, त्यापेक्षा जास्त जिंकायच्या आहेत. सध्या सर्वांना जमिनीवरील काम करायचे आहे. बूथ कार्यकर्ते सांभाळा पण त्यावर काम सोपवून देणे ही मानसिकता लोकसभेत दिसून आली. कोणावर अवलंबून राहू नका, प्रत्येक काम स्वतः म्हणून काम करा,’ असा कानमंत्र सुद्धा फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.