श्रीरामपूर : हॉटेल मालकाला जेवण मागीतल्यानंतर त्याने रात्रीचे ११ वाजले असून हॉटेल बंद झाले आहे, असं सांगून जेवण मिळणार नाही, असे म्हटल्याचा राग आल्याने चार जणांनी हॉटेल मालकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना कमालपुर गावच्या शिवारातील हॉटेल निसर्ग येथे गुरुवार २२ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
या हल्ल्यात हॉटेल मालक गंभीर जखमी झाला आहे. मनोज गोरे (रा. कमालपूर) असं जखमी व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी चार आरोपी विरुध्द श्रीरामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यास हॉटेल मालक मनोज यांचे भाऊ अशोक गोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी राजु अमृत बोडखे, दत्तात्रय नानासाहेब कांगुणे, सागर पाडुरंग पठाडे, सनी उर्फ रितेश खंडेराव जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हॉटेल निसर्ग येथे भाऊ मनोज गोरे हे बसलेले असताना तेथे आरोपी आले आणि त्यांनी जेवण मागीतले. त्यावेळी मनोज गोरे यांनी हॉटेल बंद झाले आहे. तुम्हाला जेवण मिळणार नाही, असे सांगितले. याचा राग आल्याने राजु बोडखे याने मनोज याचे दोन्ही हात पकडले. दत्तात्रय कांगुणे याने मनोज याचा गळा घट्ट दाबून धरला व सागर पठाडे याने त्याच्या हातातील धारदार हत्याराने बरगडीवर वार केले.
यावेळी अशोक गोरे यालाही आरोपींनी लाथाबुक्याने जबर मारहाण करुन ठार मारून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान या जीवघेण्या हल्ल्यात मनोज हा जबर जखमी झाला असून त्यास लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आर. एस मुंतोडे हे करत आहेत.