नाशिक : नाशिक गोदावरी रामकुंड परिसरात हिंदू धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुंदर घाट व काशी विश्वेश्वर मंदिर बांधले आहे. महानगरपालिकेने या घाटाचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट असे केले आहे. मात्र, भाविकांना सुविधा पुरविण्याच्या नावाखाली जुने ऐतिहासिक चिरेबंदी बांधकाम तोडून, त्या जागी फरशा बसविण्याचा घाट प्रशासनाने आणि ठेकेदाराने घातला आहे.
या बांधकामाला पुरोहित संघ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समिती आणि ईतिहास प्रेमी नागरिकांचा तिव्र विरोध असून ही तोडफोड थांबली नाही, तर मोठा क्षोभ निर्माण होऊन जन आंदोलन उभे राहणार आहे.
दरम्यान, सुविधांच्या नावाखाली सुरू केलेले बांधकाम तोडफोड प्रकरणात सरकार व नाशिक मनपाची प्रतिमा मलिन होत असून ईतिहास प्रेमी नागरिकांचा याला प्रखर विरोध होत आहे. सदर नुतनीकरण त्वरित थांबवून जुन्या बांधकाम, ओट्यांना धक्का लागणार नाही अशा सुचना संबंधितांना त्वरित देण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.