नाशिक : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आईच्या डोळ्यासमोरच नऊ वर्षांच्या मुलाला बिबट्याने ओढत नेल्याची दुःखद घटना घडली आहे. सिन्नरच्या दापूरमध्ये ही घटना घडली आहे. बिबट्या पोटच्या पोराला घेऊन जात असल्याचं दिसताच आईने आरडाओरड करत मदतीची आर्त हाक दिली. पण बिबट्याच्या तावडीतून मुलाला वाचवण्यात यश आले नाही.
कशी घडली घटना..
नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील दापूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रफुल्ल तांबे असं मृत बालकाचे नाव आहे. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घराबाहेर ओट्यावर उभा असताना बाजूच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करत त्याला शेतात ओढून नेलं. जन्मदात्या आईच्या डोळ्यासमोरच हा सर्व प्रकार घडला. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
शोध घेतला, पण..
तांबे कुटुंबियांनी मोठ्याने आरडाओरड केल्यावर आजूबाजूच्या वस्त्यांवरील शेतकरी धावून आले. घराशेजारी बाजरी आणि मक्याचे उंच वाढलेले पीक असल्यानं लाठ्या काठ्या हातात घेऊन टॉर्चच्या उजेडात मदतीला धावलेले तरुण थेट पिकामध्ये घुसले. घरापासून जवळपास पाचशे फूट अंतरावर प्रफुल्ल तांबे गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. बिबट्या त्याला सोडून पळून गेला होता. जखमी प्रफुल्लला तातडीने सिन्नरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, तेथे पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.