जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा एक्सल तुटला असल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. यामुळे दुरुस्तीसाठी ट्रॉलीला लावलेला जॅक निसटल्यामुळे ट्रॉलीच्या खाली दबून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बोरनार गावात घडली आहे. एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथील सोमनाथ गोरख कोळी (वय २०) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील बोरनार या गावातून जात असताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा अचानक एक्सल तुटला. त्यामुळे ट्रॅक्टर उलटून अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॉलीचा एक्सल दुरुस्तीसाठी भातखेडा येथून मॅकेनिक सोमनाथ याला घेऊन ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी दुपारी चारच्या सुमारास गावात आला. ट्रॅक्टरचा तुटलेला एक्सल दुरुस्ती करण्यासाठी त्यांनी ट्रॉलीला जॅक लावून कामाला सुरुवात केली होती. मात्र काम सुरू असताना अचानक ट्रॉलीला लावलेला जॅक निसटला. आणि दुरुस्तीसाठी मदत करणारा सोमनाथ कोळी हा ट्रॉलीखाली दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेननंतर ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मुलाला मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.