अमळनेर (जळगाव) : अमळनेरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मित्रा-मित्रांमध्ये पोहण्याची शर्यत एका एकुलत्या एक मुलाच्या जीवावर बेतली आहे. पाझर तलावात पोहण्यासाठी गेले असताना मित्रांमध्ये पोहण्याची स्पर्धा लागली आणि यामध्ये एका मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील धार येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील कंडारी येथील जयेश दीपक पाटील (वय १८) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. जयेश व त्याचे दोघे मित्र हे मारवड रस्त्यावरील धार गावाजवळील पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना त्यांच्यात स्पर्धा लागली. या स्पर्धेत जयेश तलावाच्या मध्यभागी गेला. मात्र, जास्त दमल्यामुळे त्याला बाहेर काठावर येणे शक्य झाले नाही आणि तो पाण्यात बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मारवड पोलिसांच्या उपस्थितीत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याला बाहेर काढण्यात आले. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकारी जी. एम. पाटील यांनी तपासून त्यास मृत घोषित केले.
एकुलता एक मुलगा गेला सोडून..
जयेश हा शिक्षणासाठी शहरातील अयोध्यानगरात खोली करून राहत होता. प्रताप महाविद्यालयात अकरावी केल्यानंतर त्याने बारावीसाठी मारवड येथील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. जयेश हा दीपक पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. दीपक पाटील शेतकरी असून जयेशच्या मृत्यूची बातमी कळताच कुटुंबाने एकच हंबरडा फोडला. मारवड पोलिसांत उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.