नाशिक: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला न्यायालयाने 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज त्याला चौथ्या गुन्ह्याच्या प्रकरणात नाशिक सत्र न्यायालयात व्हिडिओ (Nashik News) कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते. या सुनावणीनंतर प्रकरणाला अधिक वेग आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. (Latest Marathi News)

दरम्यान, अशोक खरातची सासू आणि कल्पना खरातची आई पार्वती शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना काही महत्त्वाची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, त्या गेल्या 1 महिन्यापासून येथे आहेत, मात्र चौकशीबाबत त्यांना कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. कल्पना नेमकी कुठे आहे हेही त्यांना माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच तिच्याशी फोनवरही संपर्क झालेला नसल्याने त्या चिंतेत असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
पार्वती शिंदे यांनी सांगितले की, पोलिसांकडून कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे, मात्र त्यांची स्वतःची चौकशी अद्याप झालेली नाही. त्या स्वतः अशिक्षित असल्यामुळे त्यांना नीट बोलता येत नाही आणि या प्रकरणाची सविस्तर माहितीही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. अशोक खरात नेमके काय करत होता याबाबतही त्यांना काहीच माहिती नव्हती. तो ऑफिसला जात असे, पण तिथे काय घडत होते याची माहिती ना त्यांना होती ना त्यांच्या मुलीला, असेही त्यांनी सांगितले.
अशोक खरातला शिक्षा व्हावी का, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी स्पष्ट उत्तर देण्यास टाळाटाळ केली. शिक्षा व्हायला नको असे त्यांनी म्हटले, मात्र सध्याच्या परिस्थितीत त्याला मदत कोण करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणामुळे कुटुंबीयांवर मोठा मानसिक ताण असल्याचे चित्र दिसून येत आहे.







