नाशिक : नाशिक मधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथून एका परप्रांतीय सात वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे चांदवड तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या चांदवड तालूक्यातील वडनेर-भैरव येथे मोलमजुरी करणाऱ्या परप्रांतीय संतोष भगत यांच्या सात वर्षीय मुलाचे तीन दिवसांपूर्वी अज्ञात तरुणाने अपहरण केले होते. आपला मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद संतोष भगत यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता.
अपहरण करून बालकाची हत्या..
सात वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी गावातील एका संशयिताला ताब्यात घेतले. संशयिताची चौकशी केली असता त्याने मुलाची हत्या करुन मृतदेह मराठी शाळेजवळ मोकळ्या जागेत फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बालकाचा मृतदेह ताब्यात घेतला.
झुडपात बालकाचा मृतदेह..
लहान मुलाला एका मंदिराजवळून आपल्या मागे येण्याचा अज्ञात तरुणाचा सीसीटीव्ही उघड झाला आहे. त्या आधारे पोलिसांनी श्वान पथकाद्वारे शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर आज बालकाचा मृतदेह शाळेच्या मोकळ्या जागेत झुडपात आढळून आला. या घटनेमुळे वडनेर-भैरव गावात एकच चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.