जळगाव : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रेयसीचे दुसऱ्या कोणासोबत प्रेम संबंध असल्याचा संशय प्रियकराला आला होता. यावरून त्या दोघांमध्ये नेहमी वाद होत असत. हाच वाद टोकाला गेला आणि यातून प्रियकराने महिलेचा गळा आवळून खून केल्याची घटना चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द येथे घडली आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील गोरगावले खुर्द येथील बापशीबाई मोहन पावरा (वय ४५) असे घटनेत मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बापशीबाई या परिवारासह गावात राहत होत्या. दरम्यान बापशीबाई या महिलेचे गावातीलच अनिल विरची पावरा याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र आपल्या प्रेयसीचे दुसऱ्या कोणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय अनिल पावरा याला होता. यावरून दोघांमध्ये नेहमी वाद होत होते.
दरम्यान, संशयित पावरा व संबंधित महिला यांच्यात किरकोळ कारणावरून नेमहीच वाद होत होते. त्यातूनच २४ सप्टेंबरच्या रात्री संशयित पावराने महिलेचा गळा आवळून खून केल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत माहिती मिळताच अडावद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. तसेच घटनेचा पंचनामा केला. याबाबत अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित अनिल पावरा याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.