अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील देहऱ्याची अल्पवयीन मुलीच्या खुनाची घटना ताजी असतानाच आता एक कर्जतमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर धारदार चाकूने हल्ला करून निघृणपणे खून केला आहे. या घटनेनंतर युवकाने स्वतःवरही चाकूने वार केले आहे. ही घटना कर्जत तालुक्यातील राक्षसवाडी येथे घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे
प्रतीक लक्ष्मण काळे (वय-२२, रा. राक्षसवाडी बुद्रुक, ता. कर्जत) असे हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. तर श्रावणी मोहन पाटोळे (१८, म्हसेवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) असे मृत्यू मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राक्षसवाडी बुद्रुक हे श्रावणीचे आजोळ असून सध्या ती येथे राहत होती. ती कर्जत येथे बारावीमध्ये शिक्षण घेत होती. आरोपी प्रतीक काळे याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. बारावीचा सराव पेपर दिल्यानंतर ती मैत्रिणीच्या समवेत तिच्या गाडीवर बसून राक्षसवाडीला आली.
प्रतीक काळे याने तिला अडवले आणि प्रेमाबाबत विचारणा केली. विनाकारण मला त्रास देऊ नको, अन्यथा मी मामाला तुझे नाव सांगेल, असे श्रावणी म्हणताच प्रतीकला राग आला. याच रागातून त्याने धारदार चाकूने श्रावणीच्या पोटामध्ये वार केला. हा वार एवढा भयंकर होता की, चाकू तिच्या पोटातून आरपार गेला आणि ती जागेवरच कोसळली. रुग्णालयात नेण्यापूर्वीच श्रावणीचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, तिचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. यावेळी आरोपीने स्वतः वरही वार करून घेतले. जखमी झालेल्या प्रतिकला नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.