नाशिक : कंपनीत काम करणाऱ्या तरुणीने आपल्या मालकास साडेपाच लाखांस गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यवसाय थाटण्यासाठी घेतलेली रक्कम न देता तरुणीने थेट खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने मालकाने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा अनिल मोरे (रा. पाथरशेंबे, ता. चांदवड) असे ठकबाज तरुणीचे नाव आहे. याबाबत नीलेश अर्जुन दळवी (रा. ध्रुवनगर) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे.
दळवी यांची कंपनी असून, या कंपनीत ही तरुणी नोकरीस होती. तक्रारदार व संशयित एकमेकांचे नातेवाईक असल्याने कंपनीचे बहुतांश काम ती सांभाळत होती. संशयित तरुणीने सन २०२२ मध्ये व्यवसाय वृद्धीसाठी स्वतःची कंपनी स्थापन करण्याची तयारी दर्शविल्याने ही फसवणूक झाली. दळवी यांनी नातेवाईक आणि विश्वासू असल्याने मदतीचा हात देत तिला ५ लाख ४३ हजार रुपये हातउसनवार दिले. ही रक्कम वेळोवेळी ऑनलाइन व रोख स्वरूपात देण्यात आली. मात्र, दीड वर्ष उलटूनही तरुणीने पैशांची परतफेड न केल्याने दळवी यांनी तिच्याकडे तगादा लावला असता तीने त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. त्यामुळे हा प्रकार पोलिसांत पोहोचला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक सुधीर पाटील करीत आहेत.