पुणे : खामलोण येथील मूळ रहिवासी भूमिपुत्र गिरीश ज्ञानदेव धोंडगे यांची महाराष्ट्र मंडळ लंडन ब्रिटनच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती केली. गिरीश यांच्या निवडीने बागलाण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
महाराष्ट्र मंडळ लंडन ही ब्रिटनमध्ये १९३२ साली स्थापन झालेली सामाजिक संस्था आहे. या संस्थेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज जयंती, गणेशोत्सव, महाराष्ट्र दिन यांसह अनेक धार्मिक उत्सव साजरे केले जातात. गिरीश धोंडगे यांचा जन्म बागलाणमध्ये झाला. त्यांचे वडील स्व. ज्ञानदेव धोंडगे व आई हेमलता धोंडगे हे दोघेही प्राथमिक शिक्षक सेवेत होते. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गिरीश यांनी पुणे विद्यापीठातून औषध निर्माण शास्त्राची पदवी व ग्लासगो कॅलोडोनियन विद्यापीठ स्कॉटलंडमधून फार्माकोलॉजीमध्ये उच्च शिक्षण घेतले आहे. ते मागील १५-१६ वर्षांपासून लंडनमध्ये स्थायिक उद्योजक आहेत.
गिरीश हे जय महाराष्ट्र, यूके समूहाचे संस्थापक आहेत. त्याद्वारे त्यांनी इंग्लंडमधील हजारोहून अधिक नागरिकांना एकत्र आणले आहे. या समूहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातून इंग्लंडमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन तसेच नोकरी, व्यवसाय, मेडिकल व सांस्कृतिक उत्सवाची माहिती उपलब्ध केली जाते.