नाशिक : ऐन भाऊबीजेलाच नाशिकमधील घोलप कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसत आहे. राजकारणातून माजी मंत्री बबन घोलप यांनी आपल्या धाकट्या लेकीलाच जाहीर नोटीस बजावली आहे. या जाहीर नोटीसमुळे नाशिकच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये भाऊ- भाऊ, भाऊ- बहीण अशी लढत बघण्यात मिळत असते. अर्थात राजकारणात हे चित्र अगदी सहज असून नाशिकमध्ये वडिलांनी मुलीच्या नावे वकिलामार्फत जाहीर नोटीस काढली आहे. यात माजी मंत्री बबनराव घोलप यांची लहान मुलगी तनुजा घोलप यांना काढलेल्या नोटिसमध्ये आपला विवाह झाला असल्याने माहेरचे नाव न लावता सासरकडील नाव लावावे; असं त्यात नमूद करण्यात आले आहे.
विशेष बाब म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडून योगेश घोलप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यावेळी बबन घोलप यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा उपनेते पदाचा राजीनामा देत योगेश घोलप यांच्यासाठी प्रचारात सरसावले आहेत. याच दरम्यान तनुजा घोलप यांनी देवळालीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे घोलप कुटुंबातील राजकारण आणि जाहीर नोटीसीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु झाली आहे.