श्रीगोंदा, (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव शिवारात एसटी बस आणि एर्टिगा कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ४ जण जागीच ठार झाले आहेत, तर ३ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.०४) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
पारगाव सेवा संस्थेचे व्हा. चेअरमन विश्वनाथ लक्ष्मण ननवरे (वय-५५), हरी तुकाराम लडकत (वय ६०), भाऊसाहेव बापूराव मडके (वय-५५), दत्तात्रय बळीराम खेतमाळीस (वय-६०) असं मृत्यू झालेल्या व्यक्तींची नवे आहेत. तर विठ्ठल गणपत ढोले (वय-३६, रा. लोणी व्यंकनाथ), रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस (वय-७०), रोहिदास सांगळे (वय-७२) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, एकादशी निमित्त आळंदी येथे माऊलींच्या दर्शनासाठी हे भाविक गेले होते. दर्शनाहुन परतत असताना त्यांच्या गाडीला भिषण अपघात झाला. श्रीगोंदा डेपो मधील एस टी बस शिरूरच्या दिशेने जात होती. एर्टिगा कार ही आळंदी येथून देवदर्शन करून पारगाव सुद्रीकच्या दिशेने येत होती. त्यावेळी ढवळगाव परिसरातील कूकडी चारी क्र. ३४ च्या वळणावर एसटी बस आणि एर्टिगा कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.