Sharad Pawar : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला धक्यावर धक्के देत आहेत. तीन दिवापुर्वीच माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपच्या पद आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अशातच आता शिवसेचे माजी आमदार नारायण आबा पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मनाला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत. यावेळी शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सुशिलकुमार शिंदे यांच्यासह माढ्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
यावेळी करमाळा विधान सभेचे शिवसेनेच माजी आमदार नारायण आबा पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २६ एप्रिल रोजी नारायण आबा पाटील यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.
शिंदे गटाला मोठा धक्का
करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघातून नारायण पाटील १३व्या विधानसभेत निवडून आले होते. २०१४ ते २०१९ या काळात ते आमदार होते. यामुळे करमाळ्यात शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे. शरद पवारांची करमाळ्यात २६ तारखेला सभा होणार आहे. त्या सभेत नारायण आबा पाटील पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
आता पुन्हा राष्ट्रवादीत
नारायण पाटील २०१४ मध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१९ मध्ये बंडखोरी करुन ते अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुक लढवली होती. त्यावेळी त्यांनी ७२ हजार मते घेतली होती. मात्र, ते शिवसेनेत राहिले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांच्याबरोबर गेले. आता शिंदे सेनेतून पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.