राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या माजी आमदाराला महिला अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. भानुदास मुरकुटे असे अटक करण्यात आलेल्या आमदाराचे नाव आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे. राहुरी पोलिसांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी तालुक्यातील एका महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी संध्याकाळी फिर्याद दाखल केली होती. 2019 पासून मुंबई, दिल्ली तसेच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे. पिडीत महिलेच्या फिर्यादीनंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले.
दरम्यान, श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिस मुरकुटे यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. मात्र, कामानिमित्त मुंबईला गेले होते. ते रात्री उशिरा श्रीरामपूर शहरात आले. त्यानंतर रात्री साडेअकराच्या दरम्यान राहुरी पोलिसांनी मुरकुटे यांना त्यांच्या निवासस्थानावरून अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
कोण आहेत भानुदास मुरकुटे?
माजी आमदार भानुदास मुरकुटे हे प्रदीर्घ काळापासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करत ते अलीकडच्या काळात भारत राष्ट्र समिती पक्षात दाखल झाले होते. आक्रमक कार्यशैलीसाठी ते ओळखले जातात.