नाशिक : घर खरेदी-विक्री व्यवहारात पाच जणांनी एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत कागदपत्रात फेरफार करीत संशयितानी जीवे ठार मारण्याची धमकी देत खंडणीची मागणी केल्याने हा प्रकार पोलिसांत पोहचला असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव शेटे, रोहन नवले, आदित्य नवले, सुभाष बोडके व शिबू जोस अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत समीना वली सय्यद (वय ६० रा. महेशनगर, तिडके कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, वृध्देची अनमोल कोहिनूर अपार्टमेंटमधील सदनिका विक्री करायची होती. त्यामुळे त्यांनी परिचीत असलेल्या जोस याच्याशी विक्री बाबत बोलणी केली होती. जोस याने गेल्या मार्च महिन्यात शेटे यांची ओळख करून दिल्याने हा आर्थिक व्यवहार झाला होता. शेटे यांनी घराच्या मिळकतीची विसार पावती रोहन नवले व आदित्य नवले (रा. दोघे विल्होळी) यांच्या नावे केली. या मोबदल्यात नवले बंधुंनी धनादेश दिले होते. मात्र धनादेश बँकेत वटण्यासाठी टाकले असता ते परत आले. यात सुभाष बोडके यांचा हात असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
या व्यवहारात शेटे यांनी केलेल्या विसार पावतीत फेरबदल करीत संशयितांनी साठेखत असा उल्लेख करून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेनंतर महिला आपल्या मुलास सोबत घेवून संशयिताकडे जाब विचारण्यासाठी गेली असताना मायलेकांना शिवीगाळ करण्यात आली. तसेच संशयितांनी खंडणीची मागणी करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक निसार अहमद करीत आहेत.