नाशिक : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर दारूमुळे कुठल्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होवू नये, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग कामाला लागला असून जिल्ह्यातील सर्वच दारू दुकानांची तपासणी सुरू आहे. मद्यविक्री, वाहतूक आणि निर्मीतीवर लक्ष ठेवून असलेल्या या खात्याने सरासरीपेक्षा जास्त दारू सांठा करणाऱ्या जिल्ह्यातील पाच दारू दुकानांवर थेट आठवडाभरासाठी निलंबनाची कारवाई केली आहे.
यामध्ये सटाणा, ओझर, ठाणगाव (सिन्नर), पालखेड मिरची (निफाड) व सावरगाव ता. जि.नाशिक आदी ठिकाणांच्या दुकानांचा समावेश आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या काळात किरकोळ देशी विदेशी मद्यविक्री करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकांकडून ठोक स्वरुपात मद्यविक्री होणार नाही, यासाठी राज्य उत्पादन शुल्क, नाशिक विभागातर्फे जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्त्यांचे निरीक्षण करण्यात येत आहे. ज्या अनुज्ञप्तीधारकांनी (परवाना) त्यांचे अनुज्ञप्तीमधून ठोक मद्यविक्री केल्याचे व अनुज्ञप्तीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ५० टक्के पेक्षा जास्त मद्यसाठा साठवणूक केल्याचे निदर्शनास आले, अशा पाच किरकोळ देशी विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या पुढील सात दिवसांकरिता निलंबित करण्यात आल्याची माहिती अधिक्षक शशिकांत गर्जे यांनी दिली.