जळगाव : व्यापारासाठी माहेरून २५ लाख रुपये आणावे म्हणून ऐश्वर्या नैतिक शाह (वय ३०) या विवाहितेला अश्लील शिवीगाळ करीत मारहाण करीत छळ करण्यात आला. हा प्रकार १ जून २०२१ पासून ते १० ऑगस्ट २०२४ पर्यंत सुरू होता. या प्रकरणी पती व सासूविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील राधाकृष्ण नगरातील माहेर असलेल्या ऐश्वर्या यांचा विवाह नाशिक येथील नैतिक हरिष शाह यांच्याशी झाला. त्यानंतर काही दिवसांनी व्यापारासाठी माहेरून २५ लाख रुपये आणावे, या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात येऊ लागला.
यामध्ये तिला अश्लील शिवीगाळ करण्यासह मारहाण करण्यात आली. तसेच जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी विवाहितेने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पती नैतिक शाह (वय ३४) व सासू पूनम शाह (वय ५३, दोन्ही रा. नाशिक) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहकों रवींद्र सोनार करीत आहेत.