नाशिक : नाशिक-पुणे मार्गावरील दारू दुकानासमोर टोळक्याने धुडघूस घालत फुटाणे विक्रेत्या महिलेस मारहाण केली. या घटनेत खाद्यपदार्थाची हातगाडी पलटी करीत टोळक्याने गल्यातील रक्कमही लांबविली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन संशयितांना बेड्या ठोकल्या असून तीन जण फरार आहेत. सागर राम सदावर्ते (२६), रोहित चंद्रकांत जाधव (२५ रा. राहूलनगर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अलका रामा साटोटे (रा. समतानगर) यांनी फिर्याद दिली आहे.
साटोटे या परिसरात चणे-फुटाणे विक्रीचा व्यवसाय करतात. गेल्या २७ जून रोजी रात्री त्या नेहमीप्रमाणे व्यवसाय सांभाळत असताना ही घटना घडली होती. संशयितांनी महिलेच्या मुलासोबत झालेल्या वादाची कुरापत काढून शिवीगाळ केली. यावेळी संतप्त टोळक्याने हातगाडी पलटी करून लाकडी दांडक्याने तोडफोड करीत मालाचे नुकसान केले. या घटनेत महिलेस लाकडी दांडका मारण्यात आल्याने ती जखमी झाले असून संशयितांनी महिलेच्या दोन्ही मुलांना मारण्याची धमकी दिली. अधिक तपास उपनिरीक्षक प्रवीण चौधरी करीत आहेत.