नाशिक : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने कारची तोडफोड करीत मामा भाच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना सातपूर गावातील खोका मार्केट भागात घडली. या घटनेत मामा-भाचे जखमी झाले असून, याप्रकरणी अकरा जणांविरुद्ध गैरकायद्याची मंडळी जमविल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बादल, खंग्या उर्फ आदित्य जाधव, सागर वाघमारे, रोशन जाधव, दिग्या जाधव, अजय, मुकेश प्रजापती, अमोल सोमासे, ज्ञानेश्वर वाघमारे, आकाश वाघमारे व टकल्या नामक युवक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत संदीप मधुकर पवार (वय ३०, रा. खोका मार्केटसमोर, सातपूर गाव) या युवकाने फिर्याद दिली आहे. संदीप पवार मंगळवारी (दि.२) रात्री जेवण आटोपून घरासमोर शतपावली करीत असताना ही घटना घडली.
परिचीत असलेल्या बादल, सागर वाघमारे व रोशन जाधव यांनी त्यास आवाज देऊन बोलावून घेतले. यावेळी संशयितांनी विड-काडीसह दारू पैशांची मागणी केल्याने संदीप पवार याने पैसे देण्यास नकार दिल्याने हा हल्ला करण्यात आला. संतप्त टोळक्याने पवार यास शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी पवारच्या बहिणीसह शुभम संजय बोराडे (वय २३) हा त्याच्या मदतीला धावून आला असता संशयिताने बहिणीस वीट फेकून मारत, तर मामा-भाच्यावर कोयत्याने हल्ला करीत जखमी केले.