अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात गोळीबाराचा प्रकार समोर आला आहे. अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवरील किर्लोस्कर कॉलनीत एका व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात बन्सी महाराज मिठाईवाले दुकानाचे मालक धीरज मदनलाल जोशी (वय-५३) यांच्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.
शहरातील अज्ञात हल्लेखोरांनी तलवार यासारख्या हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला आहे. जोशी दुकानातून घरी परतत असताना घराच्या जवळच दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हल्ला केला. जोशी यांच्या डोक्याला मार लागला असून झटापटीत हल्लेखोरांची तलवार आणि गावठी कट्टा घटनास्थळीच पडला आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, अहमदनगरमधील या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले असून, उपचारासाठी त्यांना अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, हल्ल्याचे कारण अस्पष्ट असून, या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांचेसह फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता.
जोशी यांचा राजकारणाशी संबंध नाही. त्यांचा केवळ मिठाईचा व्यावसाय आहे. हल्लेखोरांनी हल्ला करण्यापूर्वी त्यांना शिव्या दिल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी तलवारीसारखी एक वस्तू व पिस्तूल मिळून आली आहे. जोशी यांच्यावर हल्ला केल्यावर हल्लेखोर पसार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
नेमकं काय घडलं?
अहमदनगर शहरातील गुलमोहर रोडवर शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास धीरज जोशी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. जोशी हे शहरातील किर्लोस्कर वसाहतीत राहतात आणि त्यांचे शहरात रामचंद्र खुंट येथे मिठाईचे दुकान आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे ते रात्री दुकान बंद करून दुचाकीवरुन घरी निघाले होते.
याचवेळी दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर अचानकपणे हल्ला केला. त्यांच्या हातावर वार करण्यात आले. विशेष म्हणजे हल्लेखोरांकडे एक गावठी कट्टा देखील होता, मात्र झटापटीत तो खाली पडल्याने त्यांना गोळीबार करता आला नाही. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.