अहमदनगर : अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनरने दोन दुचाकींना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन चिमुकल्या भावंडाचा समावेश आहे. ही घटना पांढरी पूल परिसरात रविवारी २८ जानेवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.
अनिल बाळासाहेब पवार (वय २८), सोनाली अनिल पवार (वय २२), माऊली अनिल पवार (वय ११), अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याशिवाय सहा महिन्यांच्या चिमुकलीला देखील या अपघातात जीव गमवावा लागला आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील भगवान आव्हाड हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरीपूल येथे कंटेनरने दुचाकीला धडक दिल्याने हा भीषण अपघात घडला आहे. मयतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. या घटनेने पारनेरमध्ये हळ हळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पवार कुटुंब हे वडगाव सावताळ (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील रहिवासी होते. रविवारी कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर एकाच स्कूटीवरून ते घरी परत येत होते. सायंकाळच्या सुमारास पांढरी पूल परिसरातून पवार कुटुंब येत असताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली. या अपघातात पवार कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.