नाशिक : शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही त्यांना सावकाराकडे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी आम्ही योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांनो वीज वापरा, लाईट बिल देऊ नका. पुढील 5 वर्ष वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. नाशिकच्या कळवण येथील सभेत अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, पावसाचे दिवस आहेत, अजूनही काही धरणं भरायची बाकी आहेत. अजूनही आपल्याला पावसाची गरज आहे. मी सर्व देवांना प्रार्थना करतो. मागे मी पांडुरंगालाही प्रार्थना केली. सर्व धरणं तुडुंब भरावी, समाधानाचे वातावरण शेतकऱ्यांमध्ये येऊ दे. नाशिककरांना विनंती आहे की, द्राक्ष व्यापरी पैसे बुडवतात, सह्याद्री सारख्या काही संस्था आहेत यांच्याकडे द्राक्ष द्या. पवार साहेबांना दैवत मानून माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. अडीच वर्षे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार आले. वेगवेगळ्या विचारधारा असणारे पक्ष एकत्र आले.
आमच्या मतदार संघात काय उत्तर देणार?
पुढे अजित पवार म्हणाले, अडीच वर्षांनी सरकार पडले. विकास झाला नाहीतर आमच्या मतदार संघात काय उत्तर देणार? असे आमदार बोलत होते. मी वरिष्ठांना बोललो, जर शिवसेना चालते तर भाजप का नाही. काही मंत्रिपद देत आहेत, वेगवेगळ्या समाज घटकांना संधी देता येईल. शिवसेना ही हिंदुत्ववादी विचारधारा असणारा पक्ष आहे. मी काही माझ्या करता केलेले नाही. मी चुकीचे काम करत नाही, एखादं काम होणार असेल तर हो म्हणतो, नाहीतर नाही सांगतो. लोकांचे हेलपाटे वाचावे हा माझा नेहमी हेतू असतो. असे पवार म्हणाले.
तर त्याला मोक्का लावून तुरुंगात डांबणार..
अजित पवार म्हणाले कि, सप्तश्रृंगी गडाच्या विकासाला काही कमी पडू देणार नाही. नाशिक जिल्हा बँक अडचणीत आली आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळत नाही. सावकाराकडे जाण्याची वेळ शेतकऱ्यांना येऊ नये, यासाठी आम्ही काही योजना आणल्या आहेत. नाशिक, पुणे, सोलापूर, नगर या जिल्ह्यात कांदा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे. केंद्रात जाऊन 40 टक्के ड्युटी काढून टाका, निर्यात बंदी काढून टाका, अशी मागणी केली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे. जर कोणी भेसळ केली तर त्याला मोक्का लावून तुरुंगात डांबणार आहे. भेसळीमुळे कॅन्सर होत आहेत.
वीजमाफी दिली नाही तर..
शेतकऱ्यांनो वीज वापरा, लाईट बिल देऊ नका. साडेआठ लाख सोलर पंप आम्ही देणार आहोत. परवा जुन्नरचे 12 बिबटे पकडले, सर्व गुजरातला पाठवून दिले. विरोधक म्हणतात सर्व गुजरातला जाते, काय जातं तर बिबटे जात आहेत. पुढील 5 वर्ष वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही, असे अजित पवार यांनी आक्रमकपणे सांगितले.