अहमदनगर : अहमदनगर तालुक्यातील बहिरवाडी येथील एका तरुणाचा वेजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शेतकरी रवींद्र बाळासाहेब पाटोळे (वय ३२) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि. 25) बहिरवडी येथे घडली. तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत मृतदेह महावितरणच्या जेऊर उपकेंद्रात आणल्याने तणाव निर्माण झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र पाटोळे शेतामध्ये काम करत असताना खांबाला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे. ग्रामस्थांनी महावितरणच्या गलथान कारभारामुळेच रवींद्रचा मृत्यू झाल्याचा आरोप करत सुमारे सहा ते सात तास मृतदेह जेऊर उपकेंद्रात आणून ठेवला. यावेळी ४०० ते ५०० लोकांचा जमाव झाला होता.
दरम्यान, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विविध प्रश्न सोडविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. रवींद्रच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, वडील असा परिवार आहे. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे